Saturday, June 6, 2026

चाकरमान्यांचा उन्हाळी प्रवास ‘वेटिंग’वर! मुंबई-कोकण एसटी फेऱ्यांचा पुरता बोजवारा

Date:

गाड्यांना २ ते ३ तासांचा विलंब; रखरखत्या उन्हात प्रवाशांचे हाल, नियोजनाचा अभाव चव्हाट्यावर

रत्नागिरी प्रतिनिधी : उन्हाळी सुटीचा आनंद घेण्यासाठी कोकणाकडे निघालेल्या चाकरमान्यांना एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका बसला आहे. मुंबईतून कोकणात येणाऱ्या बहुतांश एसटी फेऱ्या तब्बल दोन ते अडीच तास उशिराने धावत असून, बसस्थानकांवर ताटकळत उभे राहणाऱ्या प्रवाशांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. महामार्गाचे काम ८० टक्के पूर्ण होऊनही केवळ बसस्थानकातूनच गाड्या उशिरा सोडल्या जात असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पनवेल स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा

मुंबईतून सुटणाऱ्या रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि दापोलीकडे जाणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी प्रवासी पनवेल स्थानकावर गर्दी करतात. मात्र, गुरुवारी या स्थानकावर एसटीच्या वेळापत्रकाचे पुरते तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. सकाळी ८ वाजता येणारी रत्नागिरी बस १०:३० ला, तर साडेआठची गुहागर बस चक्क साडेअकरा वाजता आली. प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागल्याने लहान मुले आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले.

वेळ भरून काढण्यासाठी ‘चहा-पाणी’ही बंद!

गाड्यांना आधीच विलंब झाल्याने तो वेळ भरून काढण्यासाठी चालक आणि वाहक गाड्या कुठेही न थांबवता वेगाने नेत असल्याचे चित्र होते. यामुळे प्रवाशांना वाटेत साधे पाणी किंवा जेवणासाठीही उतरता आले नाही. उशिरा आलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांचा संपूर्ण प्रवासाचा आराखडाच कोलमडून पडला आहे.


वेळापत्रकाचा असा झाला फज्जा:

प्रवास मार्ग ठरलेली वेळ प्रत्यक्ष आगमन विलंब (तास)
मुंबई – रत्नागिरी सकाळी ८.०० सकाळी १०.३० २.३० तास
मुंबई सेंट्रल – गुहागर सकाळी ८.३० सकाळी ११.३० ३.०० तास
मुंबई – चिपळूण सकाळी ९.०० सकाळी ११.०० २.०० तास
मुंबई सेंट्रल – पनवेल सकाळी ११.१५ दुपारी १.३० २.१५ तास

प्रवाशांची आर्त हाक

“महामार्गावर दिवसा खासगी वाहतुकीची पुरेशी सोय नाही, त्यामुळे आम्हाला एसटीवरच अवलंबून राहावे लागते. रात्रीचा प्रवास धोकादायक वाटतो म्हणून आम्ही दिवसाचा प्रवास निवडतो, पण एसटी महामंडळ आमची गैरसोय करत आहे. प्रशासनाने जादा बसेसची व्यवस्था करून हे वेळापत्रक सुधारावे.”

निरंजन तोडकरी, प्रवासी, गुहागर

नियोजनाची गरज

रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने हजारो चाकरमानी एसटीचा आधार घेतात. उन्हाळी गर्दीचा अंदाज असतानाही महामंडळाने पुरेसे नियोजन का केले नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर महामार्गावर प्रवास वेगवान झाला असेल, तर गाड्या आगारातूनच उशिरा का सुटत आहेत? याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.


शेअर करा

आणखी वाचा