रत्नागिरी/नवी मुंबई: कोकण विभागात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की, आपत्ती काळात नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देणे आणि मदत साहित्य घटनास्थळी जलदगतीने पोहोचवणे ही प्रशासनाची प्राथमिकता असावी. विशेषतः शहरातील नालेसफाईची कामे ३१ मे २०२६ पूर्वी १००% पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले असून, अतिधोकादायक व बेकायदेशीर इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षित स्थलांतराचे नियोजन तातडीने करण्यास सांगण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष आणि समन्वय: : प्रशासकीय सज्जतेचा भाग म्हणून कोकण विभागीय स्तरासह सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर २४x७ अहोरात्र नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये इंटरनेट, हॉटलाईन आणि अद्ययावत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरड कोसळणे, पूर किंवा चक्रीवादळासारख्या घटना घडल्यास जेसीबी, डंपर आणि वूड कटर यांसारखी यंत्रसामग्री अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी पोहोचेल, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रेल्वे किंवा रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्यास पर्यायी व्यवस्थेसाठी एसटी महामंडळाशी समन्वय राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
धरण विसर्ग आणि पर्यटकांची सुरक्षा : कोकणातील ९ मोठी आणि ९ मध्यम धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास, पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी स्थानिक नागरिकांना वेळीच इशारा देणे अनिवार्य आहे. यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात प्रभावी संवाद यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच, पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता, साहसी खेळांवर बंदी घालण्याचे आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “आपदा मित्र” उपक्रमांतर्गत प्रशिक्षित स्वयंसेवकांची मदत यासाठी घेतली जाणार आहे.
आरोग्य आणि हवामान अंदाज : हवामान विभागाने यंदा ९२% पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी औषधसाठा, पाणी शुद्धीकरण आणि स्वतंत्र साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. बाधित नागरिकांच्या निवासासाठी शाळा, मंदिरे आणि हॉल यांसारखी सुरक्षित ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तिथे अन्न, पाणी आणि वैद्यकीय सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे आदेश आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत.
जिल्हा दूरध्वनी नियंत्रण कक्ष- दूरध्वनी क्रमांक
• मुंबई शहर 022-22664232 08657106273
• मुंबई उपनगर 022-69403344 08104729077
• ठाणे 022-25301740 09372338827
• पालघर 02525-297474 08237978873
• रायगड 0241-222118/227452 0875152363
• रत्नागिरी 02352-222233 07057222233
• सिंधुदुर्ग 02362-228847 07498067835
• मंत्रालय कंट्रोल रुम 022-22027990 022-22794229 09321587143
