Saturday, June 6, 2026

मुंबई-गोवा महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; उभ्या कंटेनरला टेम्पोची भीषण धडक

Date:

संगमेश्वर प्रतिनिधी:  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज दुपारी तुरळ येथील गणपती मंदिराजवळ एक भीषण अपघात घडला. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, टेम्पोचा चक्काचूर झाला असून चालक रक्ताच्या थारोळ्यात केबिनमध्ये अडकून पडला होता.

अपघाताचे थरारक स्वरूप

मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो (क्र. MH 13 D 06803) हा मुंबईहून गोव्याच्या दिशेने अतिवेगात जात होता. तुरळ परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला (क्र. TN 88 L 1631) मागून जोरदार धडक दिली. धडक बसल्यानंतर टेम्पो महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात टेम्पोच्या केबिनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. चालक रितेश पाटील (वय २१, रा. कोल्हापूर) हा गंभीर जखमी होऊन केबिनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात अडकला होता.

पत्रकार आणि स्थानिकांची माणुसकी; चालकासाठी लावली प्राणांची बाजी

अपघाताची माहिती मिळताच राजवाडी येथील सचिन सुर्वे यांनी पत्रकार मिलिंद चव्हाण यांना कळवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पत्रकार मिलिंद चव्हाण यांनी त्यांचे सहकारी राजेंद्र भोजने, उदय चव्हाण, दत्ताराम उजगावकर, दिनेश निवळेकर, सचिन हरेकर, जयदीप फडकले आणि शैलेश फडकले यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली.

केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक होते, मात्र या सर्वांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमीला संगमेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत

अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथकातील रियाज मुजावर, सोमनाथ आव्हाड आणि बळीराम शिंदे यांनी युद्धपातळीवर काम करत अपघातग्रस्त वाहन बाजूला हटवले आणि विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली.

प्रकृती चिंताजनक; जिल्हा रुग्णालयात हलवले

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रमीज यांनी जखमी चालकावर प्राथमिक उपचार केले. मात्र, शरीराला गंभीर इजा आणि मोठ्या प्रमाणावर झालेला रक्तस्त्राव यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.

स्थानिक नागरिक, पत्रकार आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमी चालकाला ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळणे शक्य झाले, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

आणखी वाचा