Saturday, June 6, 2026

दापोलीत एसटी कर्मचाऱ्यांना मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Date:

दापोली प्रतिनिधी : दापोली येथील उर्दू शाळेजवळ बसला बाजू देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एसटी चालक आणि वाहकावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला. कोंडे-करंजाळी येथून दापोलीकडे येणाऱ्या बसला (MH 14 BT 2538) अडवून आरोपींनी चालक आशिष मळेकर यांना शिवीगाळ केली, तर मध्यस्थीसाठी आलेल्या वाहक शिवनाथ नाकाडे यांना दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे दापोली बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी वाहक शिवनाथ नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलिसांनी शेखर चंद्रकांत कालेकर, रंजित राजेंद्र यादव आणि साहिल इरशाद शार्दुला या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्याचा एसटी प्रशासनाने तीव्र निषेध व्यक्त केला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा