Friday, September 4, 2026

राजापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचा उद्दामपणा! महिला रुग्ण असताना पुरुष तंत्रज्ञाकडून ECG चा आग्रह; जिल्हा शल्य चिकित्सकांकडे गंभीर तक्रार

Date:

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचा आणि उद्धट वर्तनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छातीत दुखत असलेल्या एका महिला रुग्णाला, रुग्णालयात महिला कर्मचारी उपलब्ध असतानाही पुरुष तंत्रज्ञाकडून ईसीजी करण्यास सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर येथील रहिवासी उदय उल्हास खडपे यांनी रत्नागिरीच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडपेवाडी-राजापूर येथील रहिवासी उदय खडपे यांच्या पत्नी सौ. संगिता खडपे यांना गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे खडपे यांनी त्यांना तातडीने राजापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी रुग्णाचा तातडीने ईसीजी काढण्यास सांगितले.

महिला डॉक्टर असतानाही पुरुष तंत्रज्ञाचा हट्ट! :;त्यावेळी रुग्णालयात महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कशेळीकर आणि पुरुष डॉक्टर आर्यन उपस्थित होते. महिला डॉक्टर आणि महिला कर्मचारी उपलब्ध असतानाही, सौ. खडपे यांचा ईसीजी पुरुष तंत्रज्ञाकडून करून घेण्यास सांगण्यात आले. महिला रुग्णाच्या प्रायव्हसीचा विचार करून खडपे यांनी याला आक्षेप घेतला असता, उपस्थित डॉक्टरांनी त्यांना सहकार्य करण्याऐवजी अत्यंत उद्धट आणि उद्दामपणाची भाषा वापरत हुज्जत घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

खाजगी रुग्णालयाचा घ्यावा लागला आसरा : शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या या असहकार्यामुळे आणि वादविवादामुळे आधीच गंभीर असलेल्या महिला रुग्णाची प्रकृती अधिक खालावण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर कोणताही पर्याय न उरल्याने, खडपे यांनी आपल्या पत्नीला तशाच गंभीर अवस्थेत तातडीने एका खाजगी दवाखान्यात नेले आणि तिथे ईसीजी करून पुढील उपचार सुरू केले.

ग्रामीण भागातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! :;“आम्ही शहरातील सुशिक्षित नागरिक असूनही जर आमच्यासोबत शासकीय रुग्णालयात असा प्रकार घडत असेल, तर रात्री-अपरात्री ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आणि अशिक्षित रुग्णांचे हे डॉक्टर काय हाल करत असतील?” अशी तीव्र खंत तक्रारदार उदय खडपे यांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून महिला रुग्णांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर तात्काळ कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खडपे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवलेल्या पत्रात केली आहे. आता यावर जिल्हा शल्य चिकित्सक काय पावले उचलतात, याकडे राजापूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

आणखी वाचा