संगमेश्वर प्रतिनिधी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली घाटात असलेल्या पलट्या मारुती मंदिराजवळ आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. एका भरधाव टाटा टेम्पोने प्रवासी रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एक टाटा टेम्पो (क्रमांक डीडी ०१ सी ९८२६) गोव्याच्या दिशेने जात होता. हा टेम्पो आरवली घाटातील पलट्या मारुती मंदिराजवळ दुपारी १२:२५ वाजण्याच्या सुमारास आला असता, चालक संदीप कुमार यादव (वय ३७) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने आपल्या ताब्यातील टेम्पो समोरील एका रिक्षाला (क्रमांक एमएच ०३ डीसी ७८७०) पाठीमागून जोरदार धडक दिली. हा टेम्पो अतिशय भरधाव वेगात असल्याने त्याची धडक रिक्षाच्या उजव्या बाजूला लागली, ज्यामुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
या अपघाताच्या वेळी रामदास विजय राणे (राहणार कणकवली) हे रिक्षा चालवत होते. टेम्पोच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचालक रामदास राणे आणि रिक्षामधील प्रवासी रूपाली रामदास राणे हे दोघे जखमी झाल्या आहेत. रूपाली राणे यांच्या पायाला दुखापत झाली असून, रिक्षाचालक रामदास राणे यांच्याही पायाला मार लागला आहे.
अपघात घडताच स्थानिक नागरिक आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. महामार्गावरील वाढत्या वेगामुळे हे अपघात होत असल्याचा सूर स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
