Saturday, June 6, 2026

मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

Date:

रत्नागिरी, दि. २० (प्रतिनिधी):- भारत निवडणूक आयोगाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 नुसार व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 21 नुसार 14 मे 2026 च्या पत्रान्वये राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी भेट देवून मतदार यादी तयार करण्यासाठी प्रगणन फॉर्म भरुन घेणार आहेत.

सदर कार्यक्रमातंर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरणही करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करण्याचा अर्हता दिनांक 1 ऑक्टोबर 2026 असून सदर तारखेस पात्र मतदार आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करु शकणार आहेत. मतदार यादीची प्रारुप प्रसिध्दी 5 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून प्राप्त दावे, हरकतींवर निर्णय घेवून अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपले प्रगणन फॉर्म वेळेवर भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. या प्राथमिक टप्प्यामध्ये कोणतेही कागदपत्र जमा करण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील पाच विधानसभा संघातील पात्र मतदारांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) च्या मोहिमेस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणाचा तपशिलवार कार्यक्रम :  पुढीलप्रमाणे आहे. विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक 1 ऑक्टोबर 2026. तयारी, प्रशिक्षण व छपाई 20 जून 2026 ते 29 जून 2026. मतदान केंद्रस्तरीय अधिका-या (BLO) घरोघरी भेटी 30 जून 2026 ते 29 जुलै 2026. मतदान केंद्रांचे सुसू‌त्रीकरण 29 जुलै 2026 पर्यंत. प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 5 ऑगस्ट 2026. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026. नोटीस टप्पा / दावे व हरकती निकालात काढणे 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026. अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी 7 ऑक्टोबर 2026

राज्यात मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम 1 जानेवारी 2002 या अर्हता दिनांकावर राबविण्यात आला होता व अंतिम मतदार यादी 3 डिसेंबर 2002 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

मतदारांना सध्याच्या व सन 2002 च्या मतदार यादीमध्ये स्वतःचे नाव खालीलप्रकारे शोधात येईल. सद्याच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी http://www.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल अॅप डाऊनलोड करा Search Your Name in E-Roll/Voter List या टॅबवर क्लिक करा.

2002 च्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://www.eci.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या. किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा. Search Your Name in Last SIR या टॅबवर क्लिक करा.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या प्रत्यक्ष घरांना भेटी

जिल्हयामध्ये विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात जिल्हयातील एकूण 1 हजार 747 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत सुमारे 13 लाख 37 हजार 866 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा करण्यात येणार आहे. सदर बीएलओ 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ‘मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) त्यांना सहकार्य करणार आहेत.

प्रक्रिया अधिक पारदर्शक : भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तीची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.

शेअर करा

आणखी वाचा