Saturday, June 6, 2026

रत्नागिरी पोलिसांची अवैध शस्त्रांविरोधात मोठी कारवाई; ५ गुन्हे उघड, ८ आरोपींना अटक

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध शस्त्रांच्या बेकायदेशीर वापराला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सन २०२६ मध्ये आतापर्यंत उल्लेखनीय यश संपादन करण्यात आले असून, एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.  

७ शस्त्रे आणि २९ जिवंत काडतुसे जप्त : 

पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी एकूण ७ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. यामध्ये खालील शस्त्रांचा समावेश आहे:

०५ सिंगल बॅरल काडतुसी बंदुका   

०१ ठासणीची बंदूक   

०१ लोखंडी गावठी कट्टा   

शस्त्रांसोबतच २९ जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत, ज्यामुळे भविष्यात घडणारे संभाव्य गंभीर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. 

२.२८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत : या मोहिमेत पोलिसांनी एकूण ८ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय हत्यार अधिनियम, १९५९ (Arms Act, 1959) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमध्ये एकूण २,२८,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.

गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक : अवैध शस्त्रे बाळगणे, विक्री करणे किंवा वापरणे या विरोधात रत्नागिरी पोलीस दलाने कठोर धोरण अवलंबले आहे. “जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा आणि छापेमारी भविष्यातही अधिक प्रभावीपणे राबवण्यात येतील,” असा इशारा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिला आहे.

शेअर करा

आणखी वाचा