Saturday, June 13, 2026

चिपळूण नगर परिषदेच्या विशेष सभेत वादळी चर्चा; अनधिकृत बांधकामांवर ‘जेसीबी’ फिरणार, रस्ते रुंदीकरणाला देणार गती

Date:

चिपळूण प्रतिनिधी : आगामी पावसाळा आणि पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन चिपळूण नगर परिषदेची एक विशेष सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, मुख्याधिकारी जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे व मंगेष पेढांबकर यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. या सभेत आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनावरून नगरसेवकांनी प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवत तक्रारींचा जोरदार पाऊस पाडला आणि शहरातील प्रलंबित कामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

ते बांधकाम तातडीने तोडण्याचे आदेश: सभेत सर्वात गाजलेला मुद्दा शंकरवाडी येथील वाशिष्ठी नदीकाठच्या अनधिकृत बांधकामाचा ठरला. नगरसेवक संदीप भिसे यांनी या बेकायदेशीर बांधकामामुळे नदीपात्राला आणि मुख्य नाल्याला अडथळा निर्माण होऊन शहरात पूर येण्याचा धोका निर्माण झाल्याचे पुराव्यांसह मांडले. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सदर अनधिकृत बांधकाम तातडीने तोडण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित बांधकामधारकाने न्यायालयात जाऊन स्थगिती आणू नये, यासाठी पालिकेच्या वतीने न्यायालयात तातडीने ‘कॅव्हेट’ दाखल करण्यात येईल, असे मुख्याधिकारी जाधव यांनी स्पष्ट केले.
खारट आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल तीव्र संताप  : शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही या बैठकीत चांगलाच गाजला. उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर यांनी सध्या अर्ध्या शहराला मळभ, खारट आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. “नागरिकांना आधी शुद्ध पाणी द्या, रात्रीच्या वेळी टँकरने पाणी पुरवठा करून त्यांची गैरसोय करू नका,” अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. यावर पाणी पुरवठा सभापती निहार कोवळे यांनी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने आणखी दोन टँकर उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन दिले.
नगररचना विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर  : दुसरीकडे, शहरातील रस्ते रुंदीकरण आणि भुयारी गटार योजनेच्या संथ कारभाराबाबत नगररचना विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला. बहादूरशेखनाका, चिंचनाका ते पॉवर हाऊस आणि मुरादपूर रस्त्याची दुरवस्था व रखडलेली कामे पाहून नगररचना अधिकारी नम्रता खैरमोडे यांच्यासह एकूणच प्रशासकीय कारभारावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्यांच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांची पाहणी करून, भुयारी गटार योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कडक अटींसह पूर्वीच्याच ‘गुरव कंपनी’ला पुढील काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
लवकरच १७ नवीन इलेक्ट्रिक घंटागाड्या दाखल होणार  : शेवटच्या सत्रात शहराच्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच १७ नवीन इलेक्ट्रिक घंटागाड्या दाखल होणार असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा ठराव मंजूर करण्यात आला. यासोबतच, शहरात वाढणाऱ्या भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय म्हणून त्यांच्या गळ्यात विशिष्ट पट्टे बांधले जाणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तसेच गोवळकोट भागातील कुत्र्यांवरील गोचडीच्या त्रासावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक उदय जुवळे यांनी केली. नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनावर कंत्राटी पद्धतीने ८ फायरमन घेण्यासाठी २७ लाख ९४ हजारांच्या खर्चाला मंजुरी देत, पुढील निविदा प्रक्रिया वेळेत राबवण्याचे आदेशही सर्व विभागप्रमुखांना देण्यात आले.
शेअर करा

आणखी वाचा