Saturday, June 13, 2026

मिरकरवाड्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाला दगड आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडक मोहल्ला, मिरकरवाडा येथे जुन्या वादाचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाला दगडाने आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी मुख्य चार संशयितांसह त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादी अजमान दाऊद दर्वे (वय १८, व्यवसाय- मच्छी सप्लायर्स, रा. मिल्लत नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी) याने मे २०२६ मध्ये आरोपी उसामा पांजरी याला आपल्या बहिणीला भेटण्यास मज्जाव केला होता, ज्यावरून त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. याच जुन्या वादाचा आणि रागाचा गैरफायदा घेत ११ जून २०२६ रोजी रात्री नऊच्या सुमारास मिरकरवाडा येथे आरोपी उबेद असलम दर्वे याने फिर्यादीच्या मोबाईलला धक्का देऊन जाणूनबुजून वाद उकरून काढला. त्यानंतर त्याने तातडीने फोन करून त्याचे मित्र उसामा पांजरी, बुरहान मजगावकर, कामरान मजगावकर आणि इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. या सर्व आरोपींनी एकत्र येत फिर्यादी अजमान याला रस्त्यातच घेरले.  

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीचा टी-शर्ट पकडून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आरोपी उबेदने रस्त्यावरील दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारला, तर इतरांनी लाथाबुक्यांनी व ठोशांनी मारहाण करून त्याला रस्त्यावर पाडले. “जर तू बाहेरच्या तुझ्या मित्रांना बोलावलेस, तर तुला व त्यांना तिथेच ठार मारून टाकू” अशी धमकी देत आरोपींनी त्याला अश्लील शिवीगाळ केली. या मारहाणीनंतर रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  

शेअर करा

आणखी वाचा