अलिबाग प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. एका आईने आपल्या चार लहान मुलांना थंडपेयातून विष पाजल्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आईसह दोन चिमुरड्या मुलींचा मृत्यू झाला असून अन्य दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुलांना थंडपेयामध्ये विष मिसळून दिले : मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आशा जाधव (वय २९) या महिलेने आपल्या चार मुलांना थंडपेयामध्ये विष मिसळून दिले. त्यानंतर त्यांनी स्वतःही विष प्राशन केले. काही वेळानंतर सर्वांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती.
नंदिनी आणि दुर्वाचा मृत्यू : दुर्दैवी घटनेत आशा जाधव यांच्यासह त्यांची मुलगी नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्वा जाधव (वय ६) यांचा मृत्यू झाला. दोन्ही चिमुरड्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. दुसरीकडे, या घटनेत बचावलेल्या अन्य दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
पोटच्या चार मुलांना विष पाजून स्वतःचेही जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला : घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि प्राथमिक तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून या घटनेमागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. एका जन्मदात्या आईने आपल्या पोटच्या चार मुलांना विष पाजून स्वतःचेही जीवन संपवण्याचा निर्णय का घेतला, हा प्रश्न सध्या सर्वांनाच अस्वस्थ करत आहे.
प्राथमिक स्तरावर कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा इतर कोणत्या कारणामुळे हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे.
एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याने खरवली आदिवासी वाडीवर शोककळा पसरली आहे. नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दोन निष्पाप मुलींचा झालेला मृत्यू आणि अन्य दोन मुलांची सुरू असलेली जीवनासाठीची झुंज यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हळहळ व्यक्त करत आहे.
दरम्यान, या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपासानंतरच या भीषण घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. एका कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगाने समाजमन हेलावून गेले असून, या घटनेने अनेक गंभीर सामाजिक प्रश्नही ऐरणीवर आणले आहेत.
