रत्नागिरी प्रतिनिधी : राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या प्रतिमा यादव गवळी समाजाच्या सर्व सभागृहांमध्ये लावण्यात याव्यात तसेच त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीचे सचिव विनय खेडेकर यांनी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर यांना काल (शनिवार 13 जून 2026 रोजी) मुंबईत दिले. यावेळी प्रमोद खेडेकर आणि अजित कोटकर उपस्थित होते.
राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समितीचे निमंत्रक समाजवादी नेते कपिल पाटील आणि नाटककार ज्ञानेश महाराव यांच्या पुढाकाराने राज्यभर विविध कार्यक्रम उपक्रम राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहकारी राहिलेल्या विविध ज्ञाती संस्थांतील मान्यवरांच्या विचारांचा जागर, जागृती आणि प्रसार संबंधित समाजघटकांमध्ये व्हावा, या उद्देशाने समितीकडून अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महात्मा फुले यांचे सहकारी राहिलेले, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आणि गवळी समाजातील अग्रणी समाजसुधारक डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या विचारकार्याची ओळख यादव गवळी समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावी, तसेच त्यांच्या अभिमानास्पद योगदानाची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळावी, यासाठी यादव गवळी ज्ञाती संस्थेचे प्रमुख अजय बिरवटकर यांना निवेदन दिल्याचे विनय खेडेकर यांनी सांगितले.
