Thursday, April 16, 2026

कथित स्फटिक शिवलिंग स्थापना, अघोरी प्रकाराविरोधात मालवण तालुक्यातील वराड ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Date:

मालवण प्रतिनिधी – मालवण तालुक्यातील वराड सावरवाड येथे रुद्रनाथ फाउंडेशन यांनी उभारलेल्या कथित स्फटिक शिवलिंगा विरोधात वराडचे ग्रामस्थ एकवटले आहेत. या कथित स्फटिक शिवलिंगाला वराडच्या ग्रामस्थांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी सकाळी वराडचे ग्रामदैवत श्री वेताळ मंदिर परिसरात ग्रामस्थांची या संदर्भातील महत्त्वाची बैठक झाली. गावातील चारशे पेक्षा अधिक ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.

स्फटिक शिवलिंग परिसरात अघोरी प्रकारांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे गावरहाटीला हे प्रकार मान्य होणारे नाहीत, असे ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे. तसेच यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसून संबंधितानी त्यांचे हे दुकान येथून लवकरात लवकर हलवून गावाच्या वेशी बाहेर न्यावे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या तीव्र भावनांची तत्काळ दखल घ्यावी आणि या भागात सुरू असलेले अघोरी प्रकार थांबवावेत अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा या गाव बैठकीतून देण्यात आला आहे.

या बैठकीला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गावचे सर्व मानकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शिवसेनेचे कुडाळ मालवणचे निरीक्षक बाळा चिंदरकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस, ॲड. रुपेश परुळेकर, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल परब, सुनील आळवे, सचिन परब, तुकाराम परब, गुरुनाथ सामंत, अमित फाटक, देवेन भोगटे, बबन पांचाळ शामसुंदर वराडकर, दिनकर पांचाळ, सुरेश चव्हाण, सोनल माळी, मीनल माळी, शिवराम वराडकर, शिवानी आळवे, सुभाष सारंग, रवींद्र परब, परशुराम घाडी, अशोक परब, सुशील आचरेकर, मैथिली पेडणेकर, सुनीता सावंत यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा समावेश होता. कोणत्याही परिस्थितीत हे कथित स्फटिक शिवलिंग वराड गावच्या हद्दीतून हटविण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला जाईल, असा एकमुखी ठरावही या बैठकीत करण्यात आला.

सावरवाड गावात येऊन सात ते आठ जणांनी काही चुकीच्या गोष्टी सुरू केल्या. त्यावेळी रुद्रनाथ फाउंडेशन हे नाव पुढे आणलं गेलं. त्यांनी आशिया खंडातील वायव्यमुखी शिवलिंग आम्ही येथे आणलं अशी जाहिरात केली. आमचा शिवलिंग बसविण्याला विरोध नाही परंतु त्या ठिकाणी या नावाने सुरू असलेली अनधिकृत आणि अघोरी कृत्ये यांना तीव्र विरोध आहे, असे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रकरणातील नाव घेतले जाणारे रुद्र फाउंडेशन हे नेमके काय आहे याची माहिती जाणून घेतली असता रुद्रनाथ फाउंडेशन हे रजिस्टर ट्रस्ट आहे. त्यांचे ऑफिस हे सायन अंधेरी येथे आहे. या ट्रस्टमध्ये वराड गावातील एकही व्यक्ती नाही. तसेच या ट्रस्ट कडे कोणत्याही प्रकारचे मंदिर उभारण्याची किंवा मूर्ती स्थापन करण्याची परवानगी नाही. योग साधना शिकवणे, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा देणे असा ट्रस्टचा उद्देश असताना खोटे बोलून ही प्रतिकृती बसवली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. आमच्या गावात जर स्वयंभू महादेव बसला आहे तर आम्हाला दुसऱ्या कोणत्या स्फटिक शिवलिंगाची आवश्यकता नाही. अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी मांडली आहे.

शेअर करा

आणखी वाचा