Thursday, April 16, 2026

लोटे एमआयडीसी संकटात, गॅस पुरवठा खंडित झाल्याने उद्योगांचे उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर 

Date:

खेड प्रतिनिधी : इराण  इस्रायल अमेरिका युद्धाचा थेट परिणाम आता कोकणातील औद्योगिक क्षेत्रावर दिसू लागला आहे. नैसर्गिक वायू आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर झालेल्या परिणामामुळे खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहत गंभीर संकटात सापडली आहे.  येथे असलेल्या तीसपेक्षा अधिक कारखान्यांनी उत्पादन कमी केले आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्याने अनेक उद्योगांचे उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे. अनेकांना घरी परतावे लागत आहे. कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या जेवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. युद्ध सुरूच राहिल्यास त्याचे अतिशय गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उद्योगांच्या अडचणी वाढल्या : आखाती देशात युद्धामुळे  जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरही परिणाम झाला आहे. आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने उद्योगांच्या अडचणी  दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारखान्यातून कामगारांना जेवण व नाश्ता देण्याची व्यवस्था करणे कारखानदारांना शक्य होत नाही. त्यामुळे कामगारांचे हाल होऊ लागले आहेत. तर कामगारांच्या उपलब्धते अभावी कारखान्यांच्या उत्पादन टक्केवारीवर गंभीर परिणाम होणार आहे.
प्रशासनाचा पाईपद्वारे गॅस पुरवठ्याचा पर्याय…: 
खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी बुधवारी लोटे येथील उद्योग भवनात उद्योजकांसोबत बैठक घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. या बैठकीला महानगर गॅस कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. औद्योगिक वसाहतीत पाइपलाइनद्वारे गॅस पुरवठा करण्याचा पर्याय प्रशासनाने पुढे ठेवला आहे. मात्र, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या तातडीच्या संकटावर हा उपाय कितपत उपयोगी पडेल, याबाबत उद्योजकांनी शंका व्यक्त केली आहे.
शेअर करा

आणखी वाचा