Saturday, June 6, 2026

“चिमुकल्यांच्या हातून नववर्षाची पालखी; वाडीभर दरवळला भक्तीचा सुगंध”

Date:

संगमेश्वर (संदेश सुरेश जिमन) – संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालप वाडी येथे गुढी पाडवा निमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी एक सुंदर आणि हृदयस्पर्शी उपक्रम पाहायला मिळाला. वाडीतील बच्चे कंपनीने एकत्र येत नववर्षाची पालखी काढून परंपरा आणि संस्कारांची जपणूक केली.

चिमुकल्या हातांनी उचललेली पालखी, ओठांवर भक्तीगीतं आणि डोळ्यांत निरागस आनंद… अशा भावपूर्ण वातावरणात मुलांनी घरोघरी जाऊन पालखीतील देवाचे दर्शन गावकऱ्यांना घडवले. प्रत्येक घरासमोर थांबणारी ही पालखी केवळ एक परंपरा नव्हती, तर ती भावनांची, श्रद्धेची आणि एकोप्याची जिवंत साखळी ठरली.

या छोट्या-छोट्या पावलांनी वाडीभर भक्तीचा सुगंध दरवळला. मोबाईल आणि आधुनिकतेच्या युगातही आपली संस्कृती जपणारी ही पिढी पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. या उपक्रमातून मुलांनी केवळ आनंदच लुटला नाही, तर “आपली परंपरा आपणच जपायची” हा सुंदर संदेशही दिला. गावकऱ्यांनी या बच्चे कंपनीचे मनापासून कौतुक करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.

शेअर करा

आणखी वाचा