मुंबई प्रतिनिधी : इंडियन प्रीमियर लीगचा 19वा हंगाम आठ दिवसांत सुरु होत आहे. यापूर्वी, केवळ एक-दोन नव्हे, तर अर्धा डझन खेळाडूंच्या दुखापती आणि त्यामुळे ते खेळणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या असून, त्यामुळं संघांमधील तणाव वाढला आहे. याचा अर्थ असा की, नवीन हंगामाच्या सुरुवातीच्या आनंदाऐवजी, क्रिकेट वर्तुळात आता ‘दुखापतीं’च्याच चर्चा सुरु आहेत. केकेआर, सीएसके आणि राजस्थान रॉयल्सनंतर आता सनरायझर्स हैदराबादला दुखापतींचा फटका बसला आहे.
जॅक एडवर्ड्स बाहेर : ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख खेळाडू जॅक एडवर्ड्स आयपीएल 2026 मधून बाहेर पडल्याची बातमी समोर आली. हा तोच खेळाडू आहे, ज्याला हैदराबादनं लिलावात त्याच्या मूळ किमतीच्या 16 पट अधिक किमतीला विकत घेतलं होतं. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, परंतु बोली 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. जॅकमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीनं सामने जिंकण्याची क्षमता आहे. तो या मोठ्या टी-20 लीगमध्ये पहिल्यांदाच खेळणार होता, पण यावेळी त्याचं स्वप्न भंगलं आहे.
अनेक दिग्गज आयपीएलच्या बाहेर : क्रिकबझच्या वृत्तानुसार, 25 वर्षीय ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज सध्या दुखापतग्रस्त असून तो स्पर्धेसाठी तंदुरुस्त नसेल. संपूर्ण हंगामासाठी बाहेर झालेला एडवर्ड्स हा एकमेव खेळाडू नाही. 2026 च्या हंगामातून आधीच चार वेगवान गोलंदाज बाहेर झाले असून, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, लॉकी फर्ग्युसन आणि मथिशा पाथिराना यांसारखे अनुभवी खेळाडू सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. अशातच 19 मार्च रोजी, एडवर्ड्ससह तीन वेगवान गोलंदाज बाहेर झाल्याची बातमी समोर आली. पहिला होता जॅक एडवर्ड्स, दुसरा होता चेन्नई सुपर किंग्सचा नॅथन एलिस आणि तिसरा होता राजस्थान रॉयल्सचा सॅम करन, जे दुखापतीमुळं संपूर्ण हंगामासाठी बाहेर झाल्याचं समोर आलं आहे.
