Saturday, June 6, 2026

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी  : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने ९३ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांची घोषणा आज केली. २७ मार्च रोजी मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात शानदार समारंभात या पुरस्कारांचे वितरण आणि सन्मान सोहळा रंगणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन व कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

मंडळाचा कै. सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार प्रा. डॉ. मीनल ओक (चिपळूण), सौ. अर्चना गाडगीळ (राजापूर) आणि सौ. वैशाली पटवर्धन (रत्नागिरी) यांना जाहीर झाला आहे. साडी, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार सौ. मीरा नाटेकर यांना प्रदान करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार चिपळुणच्या आशिष महाजन व माखजन येथील परमेश्वर धामणकर यांना देऊन जाहीर झाला आहे. प्रत्येकी ४५०० रुपये व पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समशेरबहाद्दर पुरस्कार शिवणी, सांगलीचा कॅडेट प्रणय पवार आणि पन्हाळा, कोल्हापूर येथील कॅडेट सुयश चव्हाण यांना प्रत्येकी ३५०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार स्वानंद बर्वे याला व कै. आनंदाबाई त्रिविक्रम केळकर विद्यार्थिनी वसतीगृहातील वेदश्री बापट हिला देऊन सन्मानित केले जाणार आहे. जीवनगौरव पुरस्कार संगमेश्वरचे माजी आमदार रवींद्र माने यांना व सेवा गौरव पुरस्कार चांदेराई येथील डॉ. श्यामसुंदर मोरे यांना आणि कार्यगौरव पुरस्कार नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या खेरीज नगरसेविका सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. मेधा कुळकर्णी, चिंचखरी येथील प्रगतशील शेतकरी हेमंत फाटक, सीए सौरभ लेले, सीए प्रणव दामले, प्रगतशील शेतकरी व ५० वर्षे दुग्ध व्यवसाय पूर्ण करणारे उंबरवाडी कोतवडे येथील माधव भावे, शृंगेरी येथे भगवद्गीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांकप्राप्त पुण्यातील २७ वर्षीय सीए सौ. स्नेहा लिमये यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. वर्धापनदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेला अर्थसाह्य करण्यात येणार आहे. मंडळातर्फे लोकमान्य टिळक पारितोषिक, कै. केशव जोशी व कै. सौ. सुलोचना जोशी, प्रकाश देवधर, कै. आशा देवधर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मंडळाच्या सभासद व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

आणखी वाचा