Saturday, June 6, 2026

धार्मिक निष्ठा आणि चिकाटीचे दर्शन: चिमुकल्या अदिहा पटेलने कडक उन्हात पूर्ण केले रमजानचे सर्व रोजे

Date:

संगमेश्वर (प्रतिनिधी) : इस्लाम धर्मामध्ये रमजानचा पवित्र महिना हा अल्लाची इबादत, आत्मशुद्धी आणि संयमाचा काळ मानला जातो. कुरआनच्या अवतरणाचा हा महिना मुस्लीम बांधवांसाठी अत्यंत श्रद्धेचा असतो, ज्यामध्ये पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्नाचा कणही न घेता आणि पाण्याचा थेंबही न प्राशन करता ‘रोजा’ पूर्ण केला जातो. ही साधना केवळ शारीरिक नसून ती आध्यात्मिक पातळीवर माणसाला ईश्वराच्या जवळ नेते. याच कडक उन्हाच्या काळात आणि वाढत्या उष्णतेमध्ये संगमेश्वर येथील सात वर्षीय चिमुकली अदिहा एजाज पटेल हिने वयाने लहान असूनही आपली धार्मिक ओढ जपली आहे. मूळचे फुणगुस गावचे रहिवासी असलेले प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार श्री. एजाज पटेल हे सध्या संगमेश्वर येथे वास्तव्यास असून, त्यांच्या कन्या अदिहाने रमजान महिन्यातील सर्व रोजे अत्यंत श्रद्धापूर्वक आणि चिकाटीने पूर्ण केले आहेत. तिच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

अदिहाने हे कठीण व्रत पूर्ण करण्यासाठी आपली आई शबाना पटेल आणि बहिणी इक्रा व सिमरन यांचे मोलाचे मार्गदर्शन घेतले. उपवासाच्या काळात ‘सहरी’ आणि ‘इफ्तार’चे नियम पाळत, पाच वेळा नमाज अदा करून कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्यामुळे तिने हे रोजे यशस्वीपणे पूर्ण केले. एका लहान मुलीने दाखवलेली ही जिद्द पाहून संगमेश्वर तसेच फुणगुस परिसरात आनंदाचे वातावरण आहे. धर्माप्रती असलेली ही निष्ठा आणि लहान वयात जोपासलेले संस्कार हे येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत.

अदिहाच्या या कौतुकास्पद कामगिरीची आणि तिच्या धार्मिक चिकाटीची विशेष दखल नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दिनेश हरिभाऊ अंब्रे आणि प्रसिद्ध व्यावसायिक सुनीलभाऊ दोरकडे यांनी घेतली. या मान्यवरांनी प्रत्यक्ष अदिहाची भेट घेऊन तिचे अभिनंदन केले आणि तिच्या या यशाचा गौरव केला. याप्रसंगी एक विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये निरंकारी मंडळाचे रत्नागिरी प्रकाशन विभाग प्रमुख श्री. सचिन शिंदे यांच्या शुभहस्ते अदिहाला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. एका मुस्लीम बालिकेच्या धार्मिक व्रताचा हिंदू समाजातील मान्यवरांकडून अशा प्रकारे गौरव होणे, हे संगमेश्वर तालुक्यातील सर्वधर्मीय एकोपा आणि सामाजिक सलोख्याचे एक जिवंत उदाहरण मानले जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा