चिपळूण (प्रतिनिधी): शहरातील खेड संसारेवाडा परिसरात भरवस्तीत घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला चिपळूण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झालेल्या या आरोपीला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या. सुहास जयंत कासार (वय २८, रा. खंड कागणेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय? –फिर्यादी भूषण संदेश संसारे (३६, रा. खेड संसारेवाडा) हे आपल्या कुटुंबासह घराबाहेर गेले होते. १९ मार्च रोजी रात्री १० ते २० मार्च रोजी मध्यरात्री १२:३० या सुमारास घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधली. घराची खिडकी उघडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम व दागिने असा एकूण ३ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
पोलिसांची ‘सुपरफास्ट’ कारवाई : चोरीचा प्रकार लक्षात येताच भूषण संसारे यांनी २० मार्च रोजी सकाळी १२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारी २ वाजेपर्यंत आरोपी सुहास कासार याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईचा घटनाक्रम :
सकाळी १२:०० वा. – पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
सकाळी १२:३० वा. – तांत्रिक तपास आणि पथके रवाना.
दुपारी ०२:०० वा. – आरोपी सुहास कासार याला अटक.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल : चिपळूण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ (क) आणि कलम ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती, मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा अधिक सखोल तपास चिपळूण पोलीस करत असून, यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
