Friday, September 4, 2026

राम नवमीला रत्नागिरीसह जिल्ह्यात लोटला भक्तीचा महापूर, दुमदुमला श्री राम नामाचा जयघोष

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरीसह जिल्हाभरात गुरुवारी रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने आणि भक्तीमय वातावरणाने संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले होते. विशेषतः शहरातील ऐतिहासिक राम आळीतील श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रत्नागिरी तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला तसेच जिल्हा भरातही राम जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. रत्नागिरी सह विविध मंदिरांमध्ये साजरा झालेल्या या राम नवमी उत्सवाच्या वेळी ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणात करण्यात आली. रामनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

भक्तीचा महापूर आणि दर्शनासाठी गर्दी  : रामनवमीनिमित्त रत्नागिरी शहरातील सर्वच राम मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अनेक ठिकाणी तरुण आणि लहान मुले रामायणकालीन पात्रांच्या वेशभूषेत लक्ष वेधून घेत होती.

दुपारी १२ वाजता पाळणा सोहळा : पहाटेपासूनच मंदिरात काकड आरती, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, सूर्य डोक्यावर आल्यावर ‘श्रीराम जन्मोत्सव’ सोहळा सुरू झाला. “राम जन्मला ग सखे राम जन्मला…” , हर्षली अयोध्या नगरी च्या सुरावलीत आणि “जय श्रीराम” च्या घोषणांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला. यावेळी भाविकांनी प्रभू रामावर गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला.

भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष : जन्मोत्सवानंतर सायंकाळी प्रभू श्रीरामाची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध पौराणिक प्रसंगांवर आधारित चित्ररथ, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सहभागी झालेले पथक हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पताका लावून उत्सवाचे स्वागत करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला.

शेअर करा

आणखी वाचा