Thursday, April 16, 2026

‘केरोसीन देण्याची वेळ का आली?’; इंधन टंचाईवरून भास्कर जाधवांचा सरकारवर घणाघात

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : राज्यातील एलपीजी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या टंचाईवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आक्रमक आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. “देशात कशाचाही तुटवडा नाही, असे सांगणाऱ्या सरकारने आता बंद झालेले केरोसीन पुन्हा रेशनवर देण्याचा निर्णय का घेतला?” असा सवाल करत जाधवांनी सरकारला धारेवर धरले.

नेहरू आणि ठाकरेंवर अद्याप खापर फोडले नाही, त्याबद्दल आभार! : सध्याच्या टंचाईवर बोलताना भास्कर जाधवांनी भाजपला जोरदार उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “सध्याच्या एलपीजी टंचाईला पंडित नेहरू किंवा उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असे भाजपने अद्याप तरी म्हटलेले नाही, त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत.” भाजप केवळ अफवा पसरवण्यात माहीर आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

सरकारच्या दाव्यांमधील विसंगतीवर निशाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे कोरोनासारख्या परिस्थितीचा इशारा देतात, तर दुसरीकडे राज्यातील नेते सर्व काही सुरळीत असल्याच्या बाता मारतात, याकडे जाधवांनी लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ते म्हणाले की, “जर इंधनाचा तुटवडा नाही, तर रेशनिंगवर केरोसीन देण्याची वेळ का आली? हीच राज्यातील गंभीर परिस्थितीची पावती आहे.”

महागाईचा विळखा : काँग्रेसच्या काळात ३५० रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज १२०० रुपयांवर पोहोचला आहे. सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत असताना भाजप केवळ राजकारण आणि टीका करण्यात मग्न असल्याची टीकाही त्यांनी केली.

शेअर करा

आणखी वाचा