Saturday, June 6, 2026

चिपळूणच्या पागमळा आणि मार्कंडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन बंद फ्लॅटसह तीन दुकाने फोडली

Date:

चिपळूण: (प्रतिनिधी) : चिपळूण शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून पागमळा आणि मार्कंडी परिसरात धाडसी चोऱ्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट आणि तीन दुकानांना लक्ष्य केल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

एकाच रात्री पाच ठिकाणी डल्ला : मिळालेल्या माहितीनुसार, पागमळा परिसरातील एका अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. घरमालक बाहेर गावी असताना चोरट्यांनी संधी साधून कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कम लंपास केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मार्कंडी परिसराकडे वळवला. येथील तीन दुकानांच्या शटरची पट्टी वाकवून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.

सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद : घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले असून, त्यामध्ये दोन संशयित चोरटे चोरी करताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. या फूटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

पोलिस तपास सुरू : या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केला आहे. शहरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत

शेअर करा

आणखी वाचा