रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी पाटबंधारे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ३ लाख ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार या दोघांनाही शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या या धाडसी कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रकरण काय आहे? : कुवारबाव येथील पाटबंधारे विभागात तक्रारदाराच्या कामाची काही देयके (Bills) प्रलंबित होती. कपात केलेली देयकाची ही रक्कम परत मिळवून देण्याच्या बदल्यात कार्यकारी अभियंता गणेश सलगर आणि लिपिक शेखर पवार यांनी ३ लाख ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेच्या जाचाला कंटाळून तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
२ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक : तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने कुवारबाव येथील कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या रकमेबाबत तडजोड होऊन अखेर २ लाख रुपये देण्याचे ठरले. कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना एसीबीने सलगर आणि पवार या दोघांनाही रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही तात्काळ अटक करण्यात आली.
न्यायालयीन कारवाई : अटकेनंतर शनिवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलीस करत असून, यामागे आणखी काही मोठे मासे गळाला लागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
