Saturday, June 6, 2026

चिपळूणमध्ये छेडछाड करणाऱ्या ‘रोडरोमिओ’ला भरबाजारात चोप; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Date:

चिपळूण प्रतिनिधी : शहरातील एका नामांकित दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची छेड काढणाऱ्या एका तरुणाला महिलेच्या नातेवाईकांनी भरबाजारात चांगलाच चोप दिल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या राड्यामुळे चिपळूण शहरात काही काळ तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकी घटना काय? : मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण शहरातील एका प्रसिद्ध दुकानात पीडित महिला कर्मचारी म्हणून काम करते. संबंधित तरुण गेल्या काही दिवसांपासून या महिलेचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास देत होता. सुरुवातीला महिलेने याकडे दुर्लक्ष केले, मात्र तरुणाचा त्रास वाढल्याने अखेर तिने हा सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला.

शुक्रवारी दुपारी तो तरुण पुन्हा त्या ठिकाणी आला असता, आधीच दबा धरून बसलेल्या नातेवाईकांनी त्याला गाठले. संतापलेल्या नातेवाईकांनी त्याला भररस्त्यात पकडून बेदम चोप दिला. भरबाजारात सुरू असलेल्या या मारहाणीमुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

पोलिसांचा हस्तक्षेप आणि गुन्हे दाखल : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी तक्रारी नोंदवून घेतल्या असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

शेअर करा

आणखी वाचा