Thursday, April 16, 2026

रत्नागिरीत प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर नगर परिषदेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : शहरातील वाढता प्लास्टिक कचरा आणि त्यामुळे तुंबणारी गटारे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने आता कडक पावले उचलली आहेत. शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेच्या पथकाने विविध दुकानांतून तब्बल २६ किलो ५०० ग्रॅम प्लास्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली.

गटारे चोकअप; कचऱ्यात प्लास्टिकचा विळखा : शहरात भाजी, मटण, मच्छी विक्रेत्यांसह सर्वच लहान-मोठ्या दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. नागरिकही कचरा टाकताना याच पिशव्यांचा वापर करत असल्याने रस्त्यावर आणि गटारात प्लास्टिकचे ढीग साचत आहेत. यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबण्याच्या समस्या वाढल्या असून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

दंडाची आकारणी: ५ हजारांपासून सुरुवात : नगरपालिकेने या मोहिमेअंतर्गत दंडात्मक कारवाईचे स्वरूप स्पष्ट केले आहे:

पहिल्यांदा नियम मोडल्यास: ५,००० रुपये दंड.

दुसऱ्यांदा आढळल्यास: १०,००० रुपये दंड.

तिसऱ्यांदा आढळल्यास: १५,००० रुपये दंड.

चौथ्यांदा उल्लंघन केल्यास: संबंधित व्यावसायिकावर थेट कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

पहिले आठ दिवस जनजागृतीवर भर : नगरपालिकेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. सुरुवातीचे आठ दिवस नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्यात जागरूकता निर्माण केली जाणार आहे. त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची सवलत न देता थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.

“रत्नागिरी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ पालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनी स्वतःहून या मोहिमेत सहभागी व्हावे.”

— शिल्पा सुर्वे, नगराध्यक्षा, रत्नागिरी.

पहिल्या दिवसाची कारवाई : बुधवारी पालिकेच्या विशेष पथकाने शहरातील ४८ ठिकाणच्या दुकानांची अचानक तपासणी केली. यामध्ये व्यापाऱ्यांकडे साठवून ठेवलेला प्लास्टिकचा मोठा साठा जप्त करण्यात आला. सध्या कचरा गाड्यांवरील लाऊडस्पीकरवरूनही नागरिकांना कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले जात आहे.

शेअर करा

आणखी वाचा