Thursday, April 16, 2026

पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; प्रशासकीय छाप्यात १०९४ ग्राहक कार्ड जप्त

Date:

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरचा अनधिकृत व्यापार आणि काळाबाजार करणाऱ्या केंद्रावर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी राजापूर पुरवठा विभागाने ‘सद्गुरु गॅस सेवा’ केंद्रावर धाड टाकून तब्बल १०९४ ग्राहक कार्ड आणि सिलेंडर्स जप्त केले आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय? : मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांची गॅस कार्ड्स बेकायदेशीरपणे जमा करून घेतली जात होती. या कार्ड्सचा वापर करून परस्पर गॅस सिलेंडरची बुकिंग केली जायची. प्रत्यक्षात ग्राहकाला सिलेंडर न देता, ते सिलेंडर गॅस टंचाईचा फायदा घेऊन चढ्या दराने काळ्या बाजारात विकले जात होते. अनेक ग्राहकांनी तक्रार केली होती की, त्यांच्या नावावर सिलेंडरची उचल दिसत असली तरी त्यांना गॅस मिळत नव्हता.

छाप्यादरम्यान झालेली कारवाई :

१ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १:३० वाजता पुरवठा विभागाने अचानक छापा टाकला. यावेळी पथकाला खालील मुद्देमाल सापडला:

१०९४ अनधिकृतपणे साठवलेली गॅस कार्डे.

व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर.

“आम्ही गेली ४० वर्षे ही सेवा देत आहोत. ग्राहक स्वतःहून विश्वासाने आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे ठेवून जातात,” असा दावा केंद्राचे संचालक विलास भिकू कोलते यांनी केला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात कार्ड्स मिळणे संशयास्पद असल्याने सर्व मुद्देमाल राजापूर पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक : ही यशस्वी कारवाई राजापूरचे पुरवठा निरीक्षक निलेश लाड, पाचल मंडळ अधिकारी सौ. पूनम गावित, तलाठी नरके, शशिकांत कांबळे, विक्रम पाटील, कृष्णा गोरड, अमित चिले आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे यांच्या पथकाने केली.

जिल्ह्यातील इतर गॅस एजन्सींशी संबंधित कनेक्शनचे ट्रान्सफर आणि बुकिंग प्रक्रियेतही अशाच प्रकारचे गैरप्रकार सुरू आहेत का, याचा तपास आता पुरवठा विभागामार्फत केला जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पाचल परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

आणखी वाचा