संगमेश्वर (प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी परिसरात गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटेच्या सुमारास एका खासगी बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, बसमधील सर्व ३० प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
घटनेचा थरार : मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून ३० प्रवाशांना घेऊन रत्नागिरीच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स (क्रमांक NL 01 B 2442) पहाटे ३.३० च्या सुमारास साखरपा जाधववाडी येथे पोहोचली. यावेळी चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) यांना गाडीतून धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने गाडी थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
शॉर्ट सर्किटचा प्राथमिक अंदाज
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत ट्रॅव्हल्सचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.
पोलिस प्रशासनाकडून तातडीची मदत
घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, चालक तानाजी पाटील यांचा समावेश होता.
