मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेचे आयोजन : निकालाची अधिकृत घोषणा आणि निकालाची सांख्यिकीय वैशिष्ट्ये सांगण्यासाठी राज्य मंडळाच्या वतीने शनिवार, २ मे रोजी सकाळी ११:०० वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) एकत्रित निकाल जाहीर केला जाईल.
निकाल कुठे व कसा पाहाल? : विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल. दुपारी १ वाजल्यापासून निकाल लिंक कार्यान्वित होईल. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असेल:
१. विद्यार्थ्याचा आसन क्रमांक (Seat Number)
२. आईचे नाव (Mother’s Name)
बारावीचा निकाल कसा पाहायचा?
mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahahsscboard.in यातील कोणत्याही एका अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘HSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर (Roll Number/Seat Number) टाका.
तुमच्या आईचे पहिले नाव टाका.
‘View Result’ वर क्लिक करा.
निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाऊनलोड करता येतील. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठीच्या अर्जाबाबतची माहिती निकालासोबतच संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली
फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेसाठी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बोर्डाच्या निकालाकडे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकांचेही लक्ष लागून असते, कारण या निकालावरच पुढील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश अवलंबून असतात. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखेबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत होत्या, मात्र आता मंडळाने स्पष्ट केलेल्या तारखेमुळे संभ्रम दूर झाला आहे.
