Saturday, June 6, 2026

कोकणचा आंबा-काजू बागायतदार १५ मे रोजी ‘वर्षा’वर धडकणार!; राजू शेट्टी यांचा इशारा

Date:

राज्य सरकारच्या ‘वेळकाढू’ धोरणाविरोधात एल्गार

मुंबई | प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अद्याप निराशाच आहे. राज्य सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येत्या १५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी धडक देणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे.

मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने बागायतदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

बैठकीत नेमके काय घडले?

१५ मे रोजी होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बागायतदार आणि संघटनांची बैठक बोलावण्यात आली होती. महसूलमंत्र्यांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, यापूर्वीचे अनुभव पाहता शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास उडाला असल्याचे चित्र बैठकीत पाहायला मिळाले.

प्रमुख नेत्यांचे सरकारवर प्रहार:

  • राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना): “विमा कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. सरकारने एनडीआरएफकडे अद्याप मदतीचा प्रस्तावही पाठवलेला नाही. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असून शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार वेळकाढूपणा करत आहे.”

  • विनायक राऊत (माजी खासदार):कोकणातील शेतकरी आता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्याऐवजी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकऱ्यांना संकटात टाकत आहे.”

  • भाई जगताप (आमदार): “हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे कोकणचे नगदी पीक उद्ध्वस्त झाले आहे. प्रशासकीय यंत्रणा अपुरी असल्याने ५० टक्के पंचनामे अजूनही रखडले आहेत.”

प्रशासकीय आढावा आणि उपस्थिती

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पणन, कृषी, फलोत्पादन आणि मदत व पुनर्वसन विभागाचा आढावा घेतला. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह कृषी आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते.

तसेच, राजकीय स्तरावर या लढ्याला पाठबळ देण्यासाठी दिपक पवार (मराठी अभ्यास केंद्र), प्रभाकर नारकर (जनता दल सेक्युलर), राजन राजे (धर्मराज्य पक्ष), राजेंद्र कोरडे (शेकाप), कुणाल माईनकर (मनसे) आणि अरमाईटी इराणी (माकप) यांसारख्या विविध पक्षांच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती.

थोडक्यात पण महत्त्वाचे: कोकणातील बागायतदारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १५ मे चा ‘वर्षा’ बंगला घेराव हा निर्णायक ठरणार आहे. आता सरकार उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कोणता ठोस निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


शेअर करा

आणखी वाचा