Saturday, June 6, 2026

कोकणवासीयांच्या रेल्वे संघर्षाचा एल्गार! १७ मे रोजी कसालमध्ये ‘सिंधुदुर्ग रेल्वे परिषद’; शक्तीप्रदर्शनाची तयारी

Date:

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : कोकण रेल्वेच्या प्रवासात कोकणी माणसाची होणारी कुचंबणा, गाड्यांचे अपुरे थांबे आणि प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे रोजी कसाल येथील ‘साई माऊली  बँक्वेट हॉल’ मध्ये भव्य ‘सिंधुदुर्ग रेल्वे परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. “रेल्वे प्रवाशांची एकजूट दाखवून आपल्या हक्काच्या सोयीसुविधा मिळवण्यासाठी ही एक निकराची लढाई असेल,” असे प्रतिपादन कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावस्कर आणि जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

प्रवाशांच्या व्यथा: ८५ गाड्यांपैकी फक्त ३२ गाड्यांना थांबा!

पत्रकार परिषदेत बोलताना समितीने प्रवाशांच्या समस्यांचा पाढाच वाचला. मुंबईहून मडगाव-कारवारकडे जाणाऱ्या ८५ पेक्षा जास्त गाड्यांपैकी केवळ ३२ गाड्या सिंधुदुर्गात थांबतात. उर्वरित गाड्यांमध्ये परप्रांतीयांची गर्दी इतकी असते की, कोकणी प्रवाशांना अक्षरशः शौचालयाच्या बाजूला किंवा दरवाज्यात बसून प्रवास करावा लागतो.

प्रमुख मागण्या:

तुतारी आणि दादर गाड्यांना वाढीव डबे जोडणे.

वसई ते मडुरे आणि दादर ते सावंतवाडी यांसारख्या नवीन गाड्यांची तातडीने अंमलबजावणी.

नांदगाव येथे स्वतंत्र तिकीट काउंटर आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा पाठपुरावा.

सावंतवाडी-बेळगाव आणि किनारपट्टी रेल्वे मार्ग (नांदगाव-देवगड-मालवण-वेंगुर्ले-सावंतवाडी) विकसित करणे.

रेल्वेचे दुपदरीकरण जलद गतीने पूर्ण करणे.

दिग्गजांची उपस्थिती आणि जनशक्तीचा हुंकार

या परिषदेला खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील सरपंच, महिला प्रतिनिधी, बचत गट आणि मुंबईकर चाकरमान्यांनाही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.

“आम्ही आतापर्यंत अनेक निवेदने दिली, बैठका घेतल्या. त्यातून काही प्रश्न सुटले असले तरी अनेक मूलभूत समस्या रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित आहेत. आता केवळ निवेदने देऊन चालणार नाही, तर कोकणवासीयांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. ही परिषद म्हणजे रेल्वे प्रशासनाला दिलेला निर्वाणीचा इशारा असेल.”

— प्रकाश पावस्कर (अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष समिती)

निवेदने स्वीकारली जाणार : या परिषदेत केवळ चर्चाच होणार नाही, तर प्रवाशांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्यांची निवेदनेही स्वीकारली जाणार आहेत. जिल्ह्यातील दहा प्रमुख स्टेशनच्या समस्या मार्गी लावण्यासाठी या परिषदेत ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

सिंधुदुर्गवासीय आणि चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी या लढ्यात सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

आणखी वाचा