रत्नागिरी प्रतिनिधी : जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर पतीचे नाव चढवण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन महिला लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीमती संजना नंदकुमार माने (वय ४१): कोतवाल, तलाठी सजा मिळंद, ता. राजापूर. श्रीमती पुनम जससिंग गावीत (वय ३७): मंडळ अधिकारी, तळवडे, ता. राजापूर अशी ताब्यात घेतलेल्या लोकसेवकांची नावे आहेत.
घटना अशी घडली…तक्रारदार यांची मौजे जवळेथर (ता. राजापूर) येथे वडिलाोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांच्या पतीचे नाव नसल्यामुळे, ते नाव दाखल करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार १३ मे २०२६ रोजी मिळंद येथील तलाठी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी कोतवाल संजना माने यांनी तक्रारदारांना सांगितले की, फेरफार मंजूर करण्यासाठी मंडळ अधिकारी श्रीमती गावीत यांनी २५,००० रुपयांची मागणी केली आहे.
एसीबीचा सापळा आणि कारवाई : तक्रारदारांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे तक्रार नोंदवली. दिनांक १४ मे २०२६ रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तडजोडीनंतर लाचेची रक्कम २०,००० रुपये ठरली आणि ही रक्कम स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
मिळंद येथील तलाठी कार्यालयात सापळा लावला असता, कोतवाल संजना माने यांनी पंचांच्या समक्ष २०,००० रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्वीकारल्यानंतर त्यांनी मंडळ अधिकारी श्रीमती गावीत यांना फोन करून कळविले असता, गावीत यांनी त्यास संमती दर्शवली. यावरून दोन्ही महिला लोकसेवकाना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे सहाय्यक फौजदार उदय चांदणे, हवालदार विशाल नलावडे, दीपक आंबेकर, पोलिस कॉन्स्टेबल हेमंत पवार, राजेश गावकर महिला पोलिस कॉन्स्टेबल वैशाली धनवडे, समिता क्षीरसागर चालक पोलिस हवालदार प्रशांत कांबळे या पथकाचा समावेश होता.
एसीबीचे आवाहन: कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ७०३८३९१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा.
