Saturday, June 6, 2026

चिपळूण हादरले! ४ पानांची चिठ्ठी लिहून ३३ वर्षीय बँक कर्मचारी बेपत्ता; कोळकेवाडी धरणाजवळ सापडली दुचाकी 

Date:

चिपळूण प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका खासगी बँकेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय युवक पोलिसांच्या नावे चार पानांची चिठ्ठी लिहून अचानक बेपत्ता झाला आहे. मुकुंद मुरलीधर पालांडे (रा. आलोरे, ता. चिपळूण) असे या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्या वडिलांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कोळकेवाडी धरण परिसरात मुकुंदची दुचाकी आढळून आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून अनर्थाची भीती व्यक्त केली जात आहे.

चिठ्ठीत धक्कादायक खुलासे: ४ जणांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप : मुकुंद पालांडे शुक्रवारी (२२ मे) दुपारी ३ वाजल्यापासून बेपत्ता आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्याने चिपळूण पोलीस निरीक्षकांच्या नावे एक चार पानांचे सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आपल्या मानसिक त्रासाला जबाबदार धरत चार जणांच्या नावांचा थेट उल्लेख केला आहे.

पत्रातील महत्त्वाचे मुद्दे:

चिपळूण शहरातील वीरेश्वर तलाव परिसरात संबंधित चार जणांनी आपल्याला बेदम मारहाण केली होती.

त्यानंतर एका ओळखीच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवण्यात आले होते.

मात्र, यानंतरही संबंधित संशयितांकडून सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून आपण हे टोकाचे पाऊल उचलत आहोत.

धरण परिसरात दुचाकी सापडली; शोधमोहीम युद्धपातळीवर

शुक्रवारी रात्री मुकुंद घरी न परतल्याने शोध सुरू असतानाच, कोळकेवाडी धरण परिसरात त्याची दुचाकी पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आली. त्यामुळे त्याने धरणात उडी घेतल्याचा संशय बळावला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी रात्री अंधार असूनही पोलिसांनी परिसरात प्राथमिक शोध घेतला.

बोटीच्या साहाय्याने शोध: शनिवारी सकाळपासून शिरगाव पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या पथकाने बोटीच्या साहाय्याने धरणाच्या पाण्यात शोधकार्य सुरू केले आहे.

पोलीस तपास सुरू : मुकुंद पालांडे यांचा अद्याप कोणताही सुगावा लागलेला नसून, चिपळूणचे पोलीस निरीक्षक श्री. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची वेगवेगळी पथके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्या चार पानांच्या चिठ्ठीतील संशयित कोण आहेत आणि त्यांच्यात नेमका काय वाद होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण चिपळूण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

शेअर करा

आणखी वाचा