रत्नागिरी प्रतिनिधी : शहराजवळच असलेल्या कुवारबाव, साईननगर परिसरात एका २५ वर्षीय तरुणाचा पूर्ववैमनस्यातून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. ३५ ते ४० वेळा कोयत्याने सपासप वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला. याबाबत मृत सूरज झोरेची बहिण नंदा रमेश फाले (32,रा.राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग दहिसर,मुंबई) हिने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद : मृत सूरज राजाराम झोरे (वय २५, रा. विरार) हा मूळचा विरारचा असला, तरी शिक्षणासाठी रत्नागिरीत आपल्या नातेवाइकांकडे राहत होता. संशयित आरोपी सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबुल शेख ऊर्फ सोनू (सर्व रा. रत्नागिरी) यांच्याशी त्याची जुनी मैत्री होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून आणि जुन्या वादातून धुसफूस सुरू होती.
सातबंगला परिसरात बोलावले. : गुरुवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी दारू पिण्याच्या बहाण्याने सूरजला कुवारबाव येथील सातबंगला परिसरात बोलावले. तिथे चर्चा सुरू असताना वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार कोयत्याने सूरजवर हल्ला चढवला.
३५ ते ४० वार आणि थरार : आरोपींनी सूरजच्या मानेवर, हाताच्या नसांवर आणि शरीरावर अंदाजे ३५ ते ४० वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेतही सूरज कसाबसा साईननगर वस्तीजवळ पोहोचला. त्याला पाहून स्थानिक नागरिकांची घाबरगुंडी उडाली. नागरिकांनी तत्काळ याची माहिती शहर पोलिसांना दिली आणि जखमी सूरजला रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मरणापूर्वी दिली आरोपींची नावे : रुग्णालयात दाखल करताना सूरजची प्रकृती अत्यंत गंभीर होती, मात्र तो शुद्धीत होता. मृत्यूशी झुंज देत असतानाच त्याने पोलिसांना आपल्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे सांगितली. त्याच्या या जबाबाच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून तिन्ही आरोपींना रत्नागिरीतूनच बेड्या ठोकल्या.
उपचारादरम्यान मृत्यू : जास्त रक्तस्राव झाल्यामुळे सूरजची प्रकृती खालावत गेली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलीस प्रशासनाकडून पाहणी : घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, शहर पोलीस निरीक्षक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






