Saturday, June 6, 2026

रत्नागिरीत अवकाळीची मुसंडी; उकाड्यापासून दिलासा, पण अंतिम टप्प्यातील हापूस धोक्यात!

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी: मान्सून केरळच्या दिशेने वेगाने सरकत असतानाच, आज रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी सात वाजल्यापासूनच अचानक ढग जमा होऊन अनेक भागांत मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी परिसरात सकाळी सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत व त्यापुढेही पावसाचा जोर कायम होता. गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडे हा पाऊस अंतिम टप्प्यात असलेल्या हापूस आंब्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

बागायतदार संकटात (हापूसला मोठा फटका): सध्या हापूस हंगामाचा अंतिम टप्पा सुरू आहे. झाडावर असलेला तयार आंबा, काढणीस आलेला माल आणि बाजारात पाठवण्यासाठी पॅकिंग करून ठेवलेला आंबा या पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. जोरदार पावसामुळे आंबा गळती होणे, आंब्यावर डाग पडणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे बागायतदारांचे अतोनात आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच काजू पिकाला हे मोठा फटका बसला आहे आणि त्याचबरोबर फणस पिकाचे हे ठाणे झाल्याचे वृत्त आहे.

बाजारपेठ आणि व्यापारी वर्ग: अचानक आलेल्या पावसामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये एकच तारांबळ उडाली. उघड्यावर विक्री करणारे किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते आणि आंबा विक्रेते यांचे साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले. ग्राहकांचीही अचानक धांदल उडाली.

वाहतूक कोंडी आणि वीज पुरवठा खंडित: : सकाळच्या वेळी वाहनचालकांची  पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. काही सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. तसेच, अनेक ग्रामीण आणि शहरी भागांत खबरदारीचा उपाय म्हणून आणि तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

हवामान विभागाचा अंदाज: मान्सूनपूर्व हालचालींमुळे पुढील २४ ते ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेअर करा

आणखी वाचा