Saturday, June 6, 2026

मैत्रिणीशी बोलल्याचा संशय, प्रेमप्रकरणातून भररस्त्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : शहरातील साईनगर भागात एका २५ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सूरज झोरे असे मृत तरुणाचे नाव असून, ही हत्या संशयास्पद प्रेमप्रकरणातून आणि रागाच्या भरात केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तो तुला फसवून सोडून देईल. तू त्याचा नाद सोडून दे असा सल्ला त्याने तिला दिला होता. हा सल्लाच सूरज झोरे याच्या जीवावर बेतला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सोहम म्हात्रे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयाची ठिणगी आणि खुनाचा कट : मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सोहम म्हात्रे याची मैत्रिण रत्नागिरीत आली असताना सूरज झोरे याने तिला सोहमबद्दल काही गोष्टी सांगून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. तो तुला फसवून सोडून देईल. तू त्याचा नाद सोड, असा सल्ला तिला दिला होता. सूरजने तिला सोहमवर विश्वास न ठेवण्यास सांगितल्याची कुणकुण सोहमला लागली होती. आपली मैत्रिण आपल्यापासून हिरावली जाईल किंवा ती आपल्याला सोडून जाईल, या संशयाने सोहमच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. याच रागातून त्याने सूरजचा ‘काटा’ काढण्याचा कट रचला.

भररस्त्यात रक्तरंजित थरार : २१ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास हा रक्तरंजित थरार घडला. सोहम म्हात्रे आणि त्याचे साथीदार अभिषेक राठोड व नजीबुल शेख यांनी सूरजला घेरले. आरोपींनी आपल्या मैत्रिणीसमोरच सूरजवर धारदार कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. मानेवर आणि चेहऱ्यावर झालेल्या गंभीर वारामुळे सूरज रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने शेजारच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पाठलाग करून त्याला पुन्हा गाठले आणि तो मृत झाला असे समजून तिथून पळ काढला.

मृत्यूशी झुंज अपयशी; मुख्य साक्षीदार फरार : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सूरजने अत्यवस्थ परिस्थितीत आपल्या बहिणीला फोन करून आपल्यावर सोहम म्हात्रेने हल्ला केल्याची माहिती दिली होती. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे, ज्या मैत्रिणीमुळे हा सर्व प्रकार घडला, ती तरुणी घटनेनंतर लगेचच फरार झाली आहे. पोलीस सध्या तिचा शोध घेत असून, ती समोर आल्यावर या प्रकरणातील अधिक गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे.

पोलीस तपास सुरू: पोलीस सध्या हत्येसाठी वापरलेले हत्यार शोधत असून आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा