Saturday, June 6, 2026

आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार हजार फूट खोल दरीत कोसळली; सातारा, चिपळूणमधील ८ पर्यटकांचा मृत्यू

Date:

खेड (प्रतिनिधी): रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक अपघात घडला. दापोली-हर्णे येथे वीकेंड संपवून पोलादपूर मार्गे साताराकडे परतणाऱ्या पर्यटकांची स्कॉर्पिओ गाडी दाभिल टोक जवळ अनियंत्रित झाली आणि थेट १ हजार फूट खोल दरीत कोसळली. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीचा अंधार, तीव्र वळण आणि घाटातील दुर्गम परिस्थितीमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रविवार मध्यरात्री ३ ते ४ वाजल्यापासून सुरू झालेले हे कठीण बचावकार्य सोमवारी दुपारपर्यंत अखंड सुरू होते. महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाडच्या सिस्केप रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीवाची बाजी लावत दोराच्या सहाय्याने खोल दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. मात्र, रात्रीचा प्रचंड अंधार, खोल दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मदत कार्यात प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

या भीषण अपघातातील सर्व मृत प्रवासी हे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यामध्ये आसगाव येथील रितेश राजेंद्र लोखंडे (२२), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), मर्दे येथील करण आनंद शिंगटे (२१) व निखिल अभिमन्यू शिंगटे (२५), खटाव येथील वाहन चालक संदीप अशोक काटकर (३७) आणि चिपळूण (रत्नागिरी) येथील अंश समीर चव्हाण (१९) यांचा समावेश आहे. ऐन वीकेंडच्या आनंदानंतर सर्व तरुण काळाच्या पडद्याआड गेल्याने सातारा व चिपळूण परिसरावर शोककळा पसरली असून, हा अपघात नेमका कधी आणि कसा घडला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा