Saturday, June 6, 2026

मिरजोळे-भाटकरवाडीत सामाईक जागेवरून नातेवाईकांत राडा !, ९ जणांविरुद्ध शहर पोलिसांत ‘परस्पर विरुद्ध’ गुन्हे दाखल

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : शहराजवळील मिरजोळे-भाटकरवाडी येथे सामाईक घर आणि जमिनीच्या वादातून नातेवाईकांमध्येच जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. अंगणातील कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद विकोपाला गेला. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण ९ जणांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी (ता. २३) रात्री १० ते साडेदहाच्या सुमारास घडली.

वादाची पार्श्वभूमी आणि पहिली तक्रार : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे-भाटकरवाडी येथील सदानंद पांडूरंग मयेकर (वय ६०), कृष्णा शांताराम मयेकर आणि दत्ताराम शांताराम मयेकर यांच्यात सामाईक घर व जमिनीच्या जागेवरून जुना वाद आहे. हे सर्वजण नात्याने भाऊ, पुतणे आणि चुलते आहेत.

शनिवारी रात्री १० च्या सुमारास संशयित ओंमकार दत्ताराम मयेकर (वय ३५), दत्ताराम शांताराम मयेकर (वय ७०) आणि दर्शना दत्ताराम मयेकर (वय ६५) यांनी फिर्यादी सदानंद मयेकर यांच्या घरात प्रवेश केला. कृष्णा मयेकर यांच्या घरासमोर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून त्यांनी सदानंद यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाढल्याने संशयित ओमकार मयेकर याने सदानंद मयेकर यांना मारहाण करत त्यांच्या डोक्यात चिव्याची (बांबूची) काठी मारून दुखापत केली.

दुसरी तक्रार: चुलत्याला काठीने मारहाण : याच घटनेबाबत कृष्णा शांताराम मयेकर यांनी दुसरी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरात असताना ओमकार मयेकर, दत्ताराम मयेकर, दर्शना मयेकर आणि नितीन दत्ताराम मयेकर (वय ३८) यांनी अंगणातील कचरा का उचलला नाही, या कारणावरून शिवीगाळ सुरू केली. तसेच कृष्णा मयेकर यांना चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत कृष्णा मयेकर गंभीर जखमी झाले आहेत.

तिसरी तक्रार: कुऱ्हाडीने हल्ला आणि बोटाचा चावा : दुसऱ्या बाजूने ओमकार दत्ताराम मयेकर यानेही पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार, दुपारी अंगणातील कचऱ्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून संशयित सदानंद मयेकर आणि कृष्णा मयेकर यांनी कट रचला. रात्री साडेदहाच्या सुमारास ओमकार कामावरून घरी परतल्यानंतर या दोघांनी त्याला गाठून शिवीगाळ केली.

त्यानंतर सदानंद आणि कृष्णा मयेकर यांनी ओमकारच्या डोक्याच्या उजव्या बाजूला लोखंडी कुऱ्हाड मारून गंभीर दुखापत केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या ओमकारच्या आईच्या बोटाला सदानंद मयेकर याने चावा घेतला, तर कृष्णा मयेकर हातात दगड घेऊन मारण्यासाठी धावला, असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांत गुन्ह्यांची नोंद : या हिंसक धुमश्चक्रीनंतर दोन्ही बाजूंनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रारी दिल्या. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही गटांतील ९ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या कौटुंबिक वादाचा पुढील तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

शेअर करा

आणखी वाचा