Saturday, June 6, 2026

चिपळूणमध्ये हळहळ! मुंबईहून गावी आलेल्या ३० वर्षीय तरुणाचा गूढ मृत्यू; दरवाजा उघडताच कुटुंब हादरले

Date:

चिपळूण प्रतिनिधी : अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येणे किंवा अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढताना दिसत आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथे घडली आहे. मुंबईहून गावी आलेल्या पंकज नथुराम कदम (वय ३०, रा. गोवळकोट ढवळनाका, चिपळूण) या तरुणाचा  मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पंकज कदम हा तरुण नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होता, मात्र काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. घरात सत्यनारायणाची पूजा असल्याने त्याचा भाऊ राकेश कदम हा देखील मुंबईवरून गावी आला होता. शनिवार असूनही पंकज दुपारपासून घराबाहेर पडला नव्हता की त्याची काही हालचाल जाणवत नव्हती.

त्यामुळे संशय आल्याने भाऊ राकेशने त्याला आवाज दिला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर धाकधूक वाढल्याने कुटुंबाने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. समोरचे दृश्य पाहून कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. पंकज हा घरातील टेबलावर निपचित पडलेला होता.

हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

पंकजला अशा अवस्थेत पाहून कुटुंबीयांची पाचावर धारण बसली. त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याची काहीच हालचाल होत नव्हती. वेळ न घालवता शनिवारी सायंकाळी रिक्षाने त्याला तातडीने कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती रात्री आठच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.

व्हिसेरा राखून ठेवला, पोलीस तपास सुरू : याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला असून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात सध्या या प्रकरणी ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अविनाश महाडिक पुढील तपास करत आहेत.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर : ऐन उमेदीच्या काळात पंकजचा असा अचानक झालेला मृत्यू कदम कुटुंबाला मोठा धक्का देऊन गेला आहे. मृत पंकज हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात तीन भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. घरामध्ये पूजेचे आनंदी वातावरण असतानाच पंकजच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

शेअर करा

आणखी वाचा