रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोकण स्थानिक प्राधिकारी विधानपरिषद मतदार संघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसेना उपनेते बाळ माने हे सोमवार, दिनांक १ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीच्या वतीने या निवडणुकीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली असून, या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला संपूर्ण कोकण पट्ट्यातून मोठे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
अभ्युदय नगर संपर्क कार्यालयातून निघणार रॅली :
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी १०.०० वाजता शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या अभ्युदय नगर, नाचणे रोड, रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. तिथून भव्य रॅलीच्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करण्यात येईल.
महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन :
या ऐतिहासिक क्षणी महाविकास आघाडीची ताकद दाखवण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील सर्व घटकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) श्री. दत्ता कदम आणि शिवसेना जिल्हाप्रमुख (उत्तर) श्री. विक्रांत जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे खालील आघाड्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे:
महाविकास आघाडीचे (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष) सर्व जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवरील पदाधिकारी.
शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते.
शिवसहकार सेना, रिक्षासेना आणि शिवसेनेच्या इतर सर्व अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी.
कोकण विधानपरिषदेच्या या रणसंग्रामात महाविकास आघाडीने बाळ माने यांच्या रूपाने तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
