रत्नागिरी प्रतिनिधी : सोशल मीडियावरून खरेदी करणे मिरजोळे येथील एका महिलेला भलतेच महागात पडले आहे. इन्स्टाग्रामवर पाहिलेल्या एका जाहिरातीमधील ड्रेस ऑर्डर करण्याच्या नादात अज्ञात सायबर भामट्याने तब्बल १०,३१,२०९ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याप्रकरणी फिर्यादी सौ. सई प्रथमेश बांडावे (वय ३७, रा. मिरजोळे पाडावेवाडी, ता.जि. रत्नागिरी) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
४ फेब्रुवारी २०२६ ते १८ जून २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. फिर्यादी यांनी इन्स्टाग्रामवर एका ड्रेसची जाहिरात पाहून त्यात दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधला होता. सुरुवातीला त्यांनी ऑर्डरसाठी असणारे १००० रुपये गुगल पे द्वारे स्कॅनर स्कॅन करून भरले. त्यानंतर त्यांना एका अनोख्या नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण ‘ई कार्ट’मधून बोलत असल्याचे सांगून, तुमचे पार्सल आले आहे असे भासवले.
त्यानंतर ‘गव्हर्नमेंट चार्जेस’ आणि इतर विविध शुल्काच्या नावाखाली आरोपीने वेगवेगळ्या वेळी फिर्यादींकडून एकूण १०,३१,२०९/- रुपये ऑनलाईन उकळले. पैसे देऊनही पार्सल न मिळाल्याने आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. ३ जुलै रोजी दुपारी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
