Thursday, September 3, 2026

रत्नागिरी पोलीस दलाची मोठी कारवाई; तळोजा येथे सुमारे ९० लाखांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट!

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र मोहिमेतंर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, सुमारे ८९ लाख ७२ हजार ५ रुपये किमतीचे अंमली पदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथे यशस्वीरीत्या नष्ट करण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या आदेशानंतर ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’ची कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act 1985) सन २०१९ ते २०२६ या कालावधीत दाखल झालेल्या एकूण ११ गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’ (Drugs Disposal Committee) स्थापन करण्यात आली होती. या समितीत अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) श्रीमती राधिका फडके यांचा समावेश होता.

या समितीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार माननीय न्यायालयाकडून आवश्यक आदेश मिळवून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मंजुरीने हा मुद्देमाल नष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला.

जाळण्याच्या (Incineration) पद्धतीने मुद्देमाल नष्ट

आज दिनांक ४ जुलै २०२६ रोजी, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (M.W.M.L), तळोजा, नवी मुंबई या अधिकृत हानिकारक कचरा व्यवस्थापन केंद्रात अत्यंत सुरक्षितपणे व पारदर्शक पद्धतीने हा अंमली पदार्थांचा साठा जाळून (Incineration) नष्ट करण्यात आला.

नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील:

गांजा: १० किलो ०४९ ग्रॅम ०५ मिलिग्रॅम

गांजाची रोपे: ४३ नग

चरस: ०९ किलो ०७८ ग्रॅम

कोकेन (युरिया): ९२६ ग्रॅम

एकूण वजन: २० किलो ०५३ ग्रॅम ०५ मिलिग्रॅम (एकूण किंमत: ₹ ८९,७२,००५/-)

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या थेट उपस्थितीत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व त्यांच्या पथकाकडून चोखपणे पार पाडण्यात आली. रत्नागिरी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

शेअर करा

आणखी वाचा