खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी अक्षरशः रौद्ररूप धारण केले. पहाटेपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जगबुडी, नारिंगी आणि चोरद नद्यांना भीषण पूर आला आहे. जगबुडी नदीने तब्बल ९.८० मीटरची धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी थेट खेडच्या मुख्य बाजारपेठेत शिरले आहे. बाजारपेठेला निर्माण झालेला मोठा धोका पाहता व्यापारी वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून, अनेकांनी धावपळ करत दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवला. मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे काही व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागाशी संपर्क तुटला; जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
सततच्या कोसळणाऱ्या जलधारेमुळे खेड शहरासह संपूर्ण ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक सखल भाग आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, अनेक गावांचा तालुक्याशी असणारा संपर्क तुटला आहे. रविवारी सकाळी १० वाजल्यापासूनच नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. पुराचा वेढा वाढल्यामुळे ग्रामीण भाग पूर्णपणे संपर्कहीन आणि प्रभावित झाला असून, नागरिक घरातच अडकून पडले आहेत.
नगर परिषद ‘अलर्ट मोड’वर; शहरात भोंगे वाजवून सतर्कतेचा इशारा
पावसाचा वाढता जोर आणि पुराचे गंभीर संकट लक्षात घेऊन खेड नगर परिषद प्रशासन तातडीने ‘अलर्ट मोड’वर आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने शहरात भोंगे वाजवून नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. संभाव्य धोका टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आले असून, पालिकेचे पथक पूर परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र, पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने संपूर्ण खेड परिसरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
