Thursday, September 3, 2026

सामंत यांचा आदित्य ठाकरेंना टोला; केवळ ऑनलाईन राहून पक्ष वाढत नाही, जमिनीवर उतरून काम करावे लागेल

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : “केवळ मिंदे मिंदे म्हणून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा विरोधकांनी प्रथम आपल्या पक्षाच्या किती चिंध्या झाल्यात याकडे लक्ष द्यावे. स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर मैदानात उतरून फिरावे लागेल, नुसते सगळे ऑनलाईन करून पक्ष वाढत नाही,” अशा शब्दांत रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय एनडीए मधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे नेते आहेत, असे असताना त्यांच्यावर सातत्याने उपरोधिक आणि पातळी सोडून टीका करणे योग्य नाही. जमिनीवर उतरून पक्ष कसा वाढवायचा हे शिंदे साहेबांनी कृतीतून दाखवून दिले असून, त्यांच्या याच नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेवर टीका करण्यापूर्वी आत्मचिंतन करावे, असे मत सामंत यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांची गळाभेट घेणाऱ्यांनी आम्हाला शिवसेना काय आहे हे शिकवण्याची गरज नाही, असा घणाघात करत मंत्री सामंत यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला. “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले होते की, जर मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी पक्षाचे दुकान बंद करीन. असे असतानाही केवळ सत्तेसाठी काँग्रेससोबत जाणे ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे,” अशी टीका त्यांनी केली. विरोधकांनी बाळासाहेबांची युट्युबवरील भाषणे ऐकून आत्मपरीक्षण करावे. केवळ उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सतत टीका केल्याने आपण प्रकाशझोतात राहू, याच गैरसमजातून सकाळी उठल्यापासून विरोधकांचा हा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याचा टोमणाही त्यांनी लगावला.

ऑपरेशन टायगर’ सारख्या घोषणा हवेत करण्यापेक्षा विरोधकांनी आपला पक्ष कसा वाढणार, आपण गडचिरोलीत कधी जाणार आणि संकटसमयी लोकांच्या मदतीला कधी धावणार, याचा विचार करावा, असा सल्ला सामंत यांनी दिला. खेडमधील आपत्तीच्या काळात आपण स्वतः सकाळी ६ वाजता जाऊन लोकांना भेटल्याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच खासदार संजय राऊत यांच्या आजारपणाचा संदर्भ देत सामंत म्हणाले की, संजय राऊत आजारी असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बंधूंकडे प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली होती आणि राजकारण बाजूला ठेवून ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली होती. परंतु, आज विरोधकांकडून एका आजारी माणसावर (मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीवर) ज्या प्रकारे टीका केली जात आहे, त्यावरून राजकारण कुठल्या खालच्या थराला गेले आहे हेच दिसून येते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शेअर करा

आणखी वाचा