Thursday, September 3, 2026

रत्नागिरीत ७,५०० कोटींचे प्रदूषणमुक्त उद्योग; पालकमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा देणारे सुमारे ७,५०० कोटींचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आगामी काळात सुरू होणार असून, हे सर्व प्रकल्प पूर्णपणे प्रदूषणमुक्त म्हणजेच ‘ग्रीन प्रोजेक्ट’ असतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला आमदार किरण सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह विविध उद्योगांचे मालक व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देणे हाच या भव्य औद्योगिक नियोजनामागील मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

​या नव्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी जिल्ह्यातील निवेडी, मेरवी, वाटद आणि रीळ येथील प्रस्तावित जागांची उद्योजकांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाकडे अधिकृत प्रस्ताव सादर केले आहेत. पाहणी करणाऱ्यांमध्ये ‘निबे इंडिया लिमिटेड’चे संचालक गणेश निबे, ‘एआयआयएफए’चे संचालक योगेश मंदानी आणि ‘व्हीआयटी सेमीकंडक्टर्स’चे संचालक ईश्वर्या कन्नन या प्रमुख उद्योजकांचा समावेश आहे. रत्नागिरीत येणाऱ्या या सर्व उद्योगांमुळे स्थानिक पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नसून, नागरिकांनी याबाबत कोणतीही काळजी किंवा भीती बाळगू नये, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी ‘सी-प्लेन’ प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत प्रत्यक्षात सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे विमान २० आसनी असेल आणि याचे तिकीट सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे म्हणजे अवघे २,००० रुपये ठेवले जाईल. यासोबतच रत्नागिरी शहर आणि परिसरातील १५ ग्रामपंचायतींमधील कचरा आणि शेतातील वाया जाणाऱ्या तांदळाच्या पेंढ्यावर प्रक्रिया करून सीएनजी गॅस निर्माण करणारा प्लांट उभारला जाणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना अत्यंत स्वस्त दरात गॅस उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांनाही अतिरिक्त उत्पन्नाचा नवा मार्ग मिळेल.

​औद्योगिक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मेरवी किंवा वाटद येथे आकारास येणारा शिप बिल्डिंग (जहाज बांधणी) आणि सुमारे ७,५०० कोटी रुपयांचा ‘ग्रीन स्टील प्रकल्प’ असणार आहे. यामध्ये भंगार वाहने आणि स्टील कचऱ्यावर प्रक्रिया करून नवीन स्टील बनवले जाईल. यासोबतच, ‘व्हीआयटी सेमीकंडक्टर’ कंपनी येत्या दोन महिन्यांत आपल्या प्रकल्पाचे पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) उभारणीचे काम सुरू करणार आहे. महायुती सरकार आणि एमआयडीसीच्या संयुक्त प्रयत्नांतून उभे राहणारे हे उद्योगांचे जाळे रत्नागिरीतील तरुणांच्या रोजगाराची नवी पहाट ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

शेअर करा

आणखी वाचा