Thursday, September 3, 2026

दहिवली भूस्खलन दुर्घटना: ढिगाऱ्याखालून दोन्ही बेपत्तांचे मृतदेह बाहेर; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण

Date:

खेड प्रतिनिधी :  तालुक्यातील दहिवली-शेलारवाडी येथे झालेल्या भीषण भूस्खलन दुर्घटनेतील दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकाला आज यश आले आहे. सतीश शांताराम शेलार (वय ३०) आणि शांताराम बलराम शेलार (वय ८४) अशी मृतांची नावे असून, आवश्यक प्रशासकीय व वैद्यकीय सोपस्कारांनंतर आज सायंकाळी त्यांचे मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

काल रात्री दहिवली येथील शेलारवाडीत अचानक डोंगराचा कडा खचून मोठे भूस्खलन झाले. यात शेलार कुटुंबीयांचे घर ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कल्पना शांताराम शेलार (वय ७३) यांना स्थानिक यंत्रणेने वेळेत सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अडथळ्यांवर मात करत एनडीआरएफचे बचावकार्य

घटनेचे गांभीर्य ओळखून ढिगाऱ्याखाली बेपत्ता असलेल्या सतीश आणि शांताराम शेलार यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक मध्यरात्रीच चिपळूणहून घटनास्थळाकडे रवाना झाले होते. मुसळधार पाऊस, चिखल आणि रात्रीचा किर्रर्र अंधार अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे सुरुवातीला शोध मोहिमेत मोठे अडथळे निर्माण झाले. मात्र, एनडीआरएफच्या जवानांनी जीवाची बाजी लावत अथक परिश्रम घेतले आणि त्यांना स्थानिक तरुण तसेच रत्नागिरी पोलिसांचे मिळालेले सहकार्य यातून  अखेर ढिगाऱ्याखालून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.  दोन्ही मृतदेह सापडल्यानंतर एनडीआरएफने आपली शोध मोहीम पूर्ण केली असून, घटनास्थळी स्थानिक प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

शेअर करा

आणखी वाचा