Thursday, September 3, 2026

जंतर-मंतरवर खळबळ: प्रकृती खालावल्याने सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले, वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दिपकेंचा दावा

Date:

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी वांगचुक यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. सततच्या उपोषणाने वांगचुक यांच्या आरोग्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून, डॉक्टरांच्या अहवालानुसार त्यांचे वजन तब्बल ९.५ किलोने घटून ५६.५५ किलोवर आले आहे. त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या इतर आंदोलकांची प्रकृतीही सातत्याने खालावत असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले. मात्र वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेताना आंदोलकांनी जोरदार विरोध केला. 

याच दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक दावा केला आहे. आंदोलनादरम्यान काही अज्ञात घटकांकडून सोनम वांगचुक यांच्यावर दगडफेक करून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखात झाली नाही. अंतर्गत सूत्रांचा हवाला देत दीपके यांनी आधीच अशा प्रकारच्या कृत्याचा इशारा दिला होता. वांगचुक यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असे सांगत त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

दुसरीकडे, रुग्णालयात नेण्यापूर्वी वांगचुक यांनी एका व्हिडिओद्वारे आपला बाणा कायम असल्याचा संदेश दिला. “माझे २०% शरीर संपले असून आता स्नायू आणि मेंदूवर परिणाम होईल, तरीही मी २० जुलैपर्यंत जिवंत राहीन आणि कोणत्याही परिस्थितीत संसदेवर मार्च काढणारच; लोक आले नाहीत तर मी भूत बनून परत येईन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. वांगचुक यांच्या या आंदोलनाला विद्यार्थ्यांमधून मोठा पाठिंबा मिळत असून, अभिनेता हृतिक रोशननेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

वांगचुक यांच्या खालावत्या प्रकृतीमुळे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असून पक्ष-विपक्षांनी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे पवन खेडा आणि सपा खासदार डिंपल यादव यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेवर टीका करत विद्यार्थ्यांच्या दुःखाची दखल घेण्याची मागणी केली. तर आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी धर्मेंद्र प्रधान यांना हटवून वांगचुक यांना शिक्षणमंत्री करण्याची थेट मागणी केली. विशेष म्हणजे, सरकारच्या मित्रपक्षांमधील जेडीयूचे नेते भगवान सिंह कुशवाहा आणि एलजेपीचे विनीत सिंह यांनीही सरकारने आंदोलकांशी संवाद साधून तात्काळ तोडगा काढावा, अशी भूमिका मांडली आहे.

शेअर करा

आणखी वाचा