रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): बदलत्या रोजगाराच्या संधी आणि आधुनिक उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने आता कौशल्याधारित शिक्षण पद्धतीवर विशेष भर देण्याचे ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या सहा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मिळून १२ नवीन बहुविद्याशाखीय कौशल्याधारित महाविद्यालये सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव अधिसभेने (सनेट) बुधवारी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कोकणासह मुंबई व परिसरातील तरुणांना स्थानिक पातळीवरच रोजगाराभिमुख आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्ती आणि उद्योगांच्या आवश्यकतांचा अभ्यास करून या महाविद्यालयांची संपूर्ण आखणी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
नवनवीन अभ्यासक्रम शिकण्याची सुवर्णसंधी : या प्रस्तावित कौशल्याधारित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांशी निगडित अनेक नवनवीन अभ्यासक्रम शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये आर्थिक तंत्रज्ञान (FinTech), रोबोटिक्स, औद्योगिक स्वयंचलन (Industrial Automation), विद्युत वाहन तंत्रज्ञान (EV Tech), वाहतूक व बंदर व्यवस्थापन, सागरी अध्ययन, ब्लू इकोनॉमी आणि मत्स्यव्यवसाय यांसारख्या विषयांचा प्रामुख्याने समावेश असेल. याशिवाय कृषी व्यवसाय, पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन, ड्रोन व भौगोलिक माहिती तंत्रज्ञान (GIS), पर्यावरण व कांदळवन संवर्धन, हवामान बदल अध्ययन, डिजिटल आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन तसेच बांबू व आदिवासी उद्योजकता यांसारखे स्थानिक विकासाला पूरक असणारे अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना येथे शिकता येणार आहेत.
कौशल्यांचा आणि उद्योजकतेचा थेट समावेश : केवळ नवीन महाविद्यालयेच नव्हे, तर पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांची रचना बदलून त्यात आधुनिक कौशल्यांचा आणि उद्योजकतेचा थेट समावेश केला जाणार आहे. उदाहरणार्थ, इतिहास विषयात आता डिजिटल इतिहास व अभिलेख व्यवस्थापन, सार्वजनिक इतिहास, वारसा पर्यटन, सांस्कृतिक संसाधन व्यवस्थापन आणि इतिहास संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारखे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू केले जातील. तसेच राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत डिजिटल जनसमर्थन, राजकीय विश्लेषणातील कृत्रिम बुद्धिमत्ता, राजकीय संवाद, जोखीम विश्लेषण आणि धोरण समर्थन यांसारख्या आधुनिक कौशल्यांचे धडे दिले जाणार आहेत. या सर्वांगीण बदलांमुळे तरुण पिढीला नवीन कौशल्यांसह रोजगाराच्या व नवउद्योगांच्या अफाट संधी उपलब्ध होतील.
