Thursday, September 3, 2026

शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांचा राजकीय मोर्चासाठी वापर; महायुतीचा थेट आरोप, कडक कारवाईची मागणी

Date:

रत्नागिरी प्रतिनिधी : देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत काढण्यात आलेल्या मोर्चावरून आता स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. हा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात राजकीय षड्यंत्र रचण्यासाठी, असा थेट सवाल उपस्थित करत महायुतीने (शिवसेना-भाजप) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रत्नागिरीतील काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने या मोर्चात उतरवल्याचा खळबळजनक आरोप महायुतीने केला असून, निष्पाप विद्यार्थ्यांचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.

पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, शहरप्रमुख बिपिन बंदरकर आणि भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी महायुतीची आक्रमक भूमिका मांडली. विद्यार्थी उत्स्फूर्तपणे मोर्चात आले असते तर आमचा काहीही आक्षेप नव्हता; मात्र संस्थांनी दबाव आणून त्यांना आणल्याचे स्पष्ट पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावा पदाधिकाऱ्यांनी केला. स्वतः विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत तक्रारी केल्याचे सांगत, जंतर-मंतरवरील आंदोलनातील चेहरे आता रत्नागिरीत येऊन देश प्रमुखांसह उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत असल्याचा तीव्र निषेध महायुतीने नोंदवला.

विद्यार्थ्यांना कोणताही अन्याय सहन करावा लागणार नाही : दरम्यान, केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. नीट परीक्षेतील अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाधित विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र स्तरावर विविध पर्यायांवर गांभीर्याने विचार सुरू असून, विद्यार्थ्यांना कोणताही अन्याय सहन करावा लागणार नाही, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.

गुन्हा दाखल केला जाईल :ज्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना या राजकीय आंदोलनात ढकलले, त्यांच्यावर तात्काळ व कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका पालकमंत्र्यांच्या वतीने महायुतीने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी महायुतीचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करणाऱ्या आणि देशप्रमुखांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या घटकांविरोधात रीतसर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही महायुतीने दिला आहे.

शेअर करा

आणखी वाचा