रत्नागिरी प्रतिनिधी: कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्गावर सध्या उनाड गुरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शहरातील जे. के. फाईल्स परिसरापासून ते खेडशीपर्यंत महामार्गाच्या मध्यभागीच ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विकासाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूच्या दाढेतून जाण्यासारखे झाले आहे. रस्त्याच्या मधोमध निर्धास्तपणे बसणाऱ्या या गुरांमुळे वेगाने जाणाऱ्या वाहनांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत.
रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच गंभीर : रस्त्यावर अचानक आडव्या येणाऱ्या किंवा मध्यभागी बसलेल्या गुरांना वळसा घालताना दुचाकी व चारचाकी चालकांची मोठी तारांबळ उडते. त्यातच खेडशी ते हातखंबा या पट्ट्यात पथदिव्यांचा पूर्णपणे अभाव असल्याने रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच गंभीर बनतो. अंधारामुळे रस्त्यावरील गुरे वेळेवर दिसत नाहीत, ज्यामुळे एखाद्या मोठ्या अपघाताची भीती सातत्याने निर्माण होत आहे. एखाद्या सुरक्षित महामार्गाला जनावरांचा मुक्त संचार मार्ग बनवल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कायमस्वरूपी बंदोबस्त आवश्यक : प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच यंत्रणेला जाग येणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहनचालक विचारत आहेत. या गंभीर समस्येकडे जिल्हयाच्या पालकमंत्र्यांनी आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. महामार्गावर उनाड गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापसात समन्वय साधून ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
