मुंबई प्रतिनिधी : श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कोकणवासीयांच्या प्रवासासाठी विशेष तयारी केली आहे. ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतून तब्बल ५,२२० जादा बसेस सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मुंबईत आयोजित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत ही घोषणा केली.
नुकत्याच पार पडलेल्या एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व प्रमुख विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत बोलताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे नफा-तोट्याचा कोणताही विचार न करता, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन एसटी महामंडळ पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.
या जादा बसेससाठीचे ऑनलाइन आरक्षण अधिकृत संकेतस्थळासह ‘MSRTC Bus Reservation’ या मोबाईल ॲपवर आणि सर्व प्रमुख बसस्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून विशेष ‘गट आरक्षण’ सुविधा सुरू केली जाणार आहे. या गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत लागू राहील.
आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या ५,२०० जादा बसेसला भाविकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाच्या धर्तीवरच यंदाच्या गणेशोत्सवासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर येथील प्रमुख स्थानकां वरून या बसेस कोकणातील विविध मार्गांवर मार्गस्थ होतील. गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळावी, यासाठी महामंडळाने वाहतुकीचे काटेकोर नियोजन केले आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहावी यासाठी सर्व मुख्य बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. याशिवाय, कोकणातील प्रमुख महामार्गांवर प्रवासादरम्यान गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास तातडीने मदतीसाठी विशेष वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी महामंडळाकडून सर्वतोपरी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
